कोरोना मृत्यू झालेल्या महापालिकेच्या १८ कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची मागणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कोरोना मृत्यू झालेल्या महापालिकेच्या १८ कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची मागणी


कोरोना सेवेत काम करणाऱ्या सर्व मृत कामगारांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आयुक्त हर्डीकर व पक्षनेते नामदेव ढाके यांचे आश्वासन


भाजप कामगार आघाडीच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेत केली मागणी


पिंपरी दि.१९ (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोना सेवेत कोरोनाने मृत्यु झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत व केंद्र सरकारचीही पन्नास लाख रुपयांची अशी एकुण मिळुन प्रत्येकी एक करोड रुपयांची आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले होते परंतु अद्यापही त्यांच्या वारसांना मदत मिळाली नसल्याने भाजप कामगार आघाडीच्या वतीने महापालिका आयुक्त व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची भेट घेत सर्व पीडित कामगारांच्या वारसांना लवकर मदत करण्याची मागणी केली आणि आयुक्तांनीही याची दखल घेत लवकरच आर्थिक मदत दिली जाईल याचे आश्वासन दिले आहे.


भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेत आयुक्तांशी भेट घेत याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली त्यावेळी आयुक्त व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मृत कोरोनायोद्धा कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देणारच व उर्वरित सध्या कोरोना सेवेत काम करत असणाऱ्या कामगारांना, घरोघरी सर्व्हेक्षण करणाऱ्या कामगारांना आणि यात सहभागी सामाजिक संस्थांनाही रुपये पन्नास लाखाचे आर्थिक कवच देण्याचे आश्वासन दिले आहे.


भाजप कामगार आघाडीच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे त्यात असे म्हणले आहे की, "पिंपरी चिंचवड शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असताना आपल्या जीवाची कसलीच पर्वा न करता रुग्णांना विलगीकरण करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पालिकेतील सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्गाने रुग्णांना जेवण, नास्ता, औषध पुरविणे तसेच रुग्णांची योग्य व्यवस्था करत असताना अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यात महापालिकेतील सहाय्यक आयुक्त, शिपाई, चालक- वाहक कर्मचारी यांचा समावेश झाला आहे. 


पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या आरोग्याची व जीविताची काळजी घेताना या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा व आपल्या कुटूंबियाचा कसलाही विचार केला नव्हता, खुप कठीण काळात "कोरोनायोद्धे" बनत त्यांनी अनेकांचे जीव वाचवले, त्यावेळी आपण कोरोनामुळे मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती, आजतागायत पालिकेतील एकुण १८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झालेला असताना त्यांच्या वारसांना ही आर्थिक मदत अद्यापही मिळालेली नाही किंवा त्यासाठी प्रभावी पाऊले उचलली जात नाहीत ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखाची आर्थिक मदत करत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी याचा आपण गांभीर्याने विचार करावा.


केंद्र शासनानेही महापालिका कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखाची विमा योजनेची घोषणा करत न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीला थर्ड पार्टी म्हणुन नियुक्त केलेले आहे, परंतु या कंपनीची अशी अट आहे की, १६ दिवस आधी कोरोना सेवेत कार्यरत असणारेच कर्मचारी यासाठी पात्र असतील या आठमुठ्या अटीच्या भुमिकेमुळे यातील काही मृत कामगारांचे वारसदार हे केंद्र शासनाच्या या विम्यापासुन वंचित राहणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी. 


तरी आम्ही आपणास भाजप कामगार आघाडीच्या वतीने अशी विनंती व मागणी करतो की, या सर्व १८ कोरोनाबाधित मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना लवकरात लवकर महापालिकेचे ५० लाख व केंद्र शासनाचे ५० लाख असे एकुण प्रत्येकी एक एक कोटी रुपये आर्थिक मदत मिळेल अशी तजबीज करावी व कोरोनायुद्धात शहीद झालेल्या १८ शुरवीरांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या स्वरूपाने श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी त्यात केली आहे 


यावेळी भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश मुगडे, जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे, धनाजी नरसिंग, रामचंद्र भोसले, उपाध्यक्ष दादासाहेब वारे, शंकर पाटील हनुमंत जाधव, चिटणीस गिरीष क्षीरसागर, खंडाप्पा बिराजदार, प्रमोद कुऱ्हाडे, सुधीर पराळे व भाऊसाहेब जाधव हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.