लग्नानंतरही आपली स्वप्न मागे पडू देऊ नका;.... स्वाती हनमघर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



------------------


पुणे :- लग्न हा कधीच तुमच्या स्वप्नाच्या मध्ये येणारा अडथळा नसतो. तुम्ही काळानुसार आणि वयानुसार अधिक मजबूत होतात. त्याचा उपयोग तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायला हवा, असा आत्मविश्वास स्वाती हनमघर देतात. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सदस्य असलेल्या स्वाती हनमघर यांची नुकतीच अखिल भारतीय चित्रपट महामंडळ समारंभ नियोजन समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. या पदापर्यंत पोहोचण्याआधीच्या खडतर प्रवासाबद्दल स्वाती हनमघर सांगतात, "हिरा चकाकण्यासाठी त्याला जितके घासू तितका तो चमकून दिसतो. त्यामुळे तुम्ही जितकी मेहनत घ्याल, जितके अशक्य प्रयत्न कराल तितक्या पटीने तुम्ही मोठी झेप घ्याल. तसेच, आताच्या घडीला स्वतंत्र स्त्री (इंडिपेंडंट वूमन) म्हणून आयुष्याकडे बघणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा आणि स्वाभिमान देते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा, 'स्व'चे अस्तित्व जपा. स्वाभिमान आणि स्वतःची ओळख मिळवण्यासाठी तुमच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात करा. आयुष्यातील इतर जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेतच. पण त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्ही तुमच्या स्वप्नांना महत्त्व देऊन त्या दिशेने काय प्रयत्न करतात, ही खरी लढाई असते" 


गरवारे कॉलेजमधून कला शाखेच्या पदवीधर असलेल्या स्वाती हनमघर यांना शालेय वयातच मनोरंजन क्षेत्राची आवड निर्माण झाली. त्यावेळी त्यांनी नाटक, वेशभूषा स्पर्धा, मॉडेलिंग स्पर्धा यामध्ये भाग घेऊन स्वतःची आवड जोपासली. या काळात सौंदर्याच्या क्षेत्रात आपण पुढे जाऊ शकतो हा आत्मविश्वास आल्यानंतर त्यांनी ब्युटी पार्लरचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यांनतर ब्युटी इंडस्ट्रीमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून त्या काम करत आहे. 


अखिल भारतीय चित्रपट महामंडळ समारंभ नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाती हनमघर म्हणतात, "जे लहानपणी स्वप्नात पाहिले होते, ते सत्यात घडताना पाहून खूप आनंद होतो. माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे माझे या क्षेत्रासाठी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न असेल. मी या संधीला न्याय देऊन नवोदित कलाकारांसाठी या क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देईल."


सौंदर्य क्षेत्रातील महत्त्वाचे टप्पे पार करताना हनमघर यांनी मिसेस पेशवाई रनरअप, कॅलेंडर शुट, मिसेस ग्लॅमरस या ब्युटी पिजन्ट केल्या असून मिसेस गोर्जियस क्विन ऑफ महाराष्ट्रमध्ये डायनॅमिक टायटल विजेती ठरल्या आहेत. तर, त्यांनी सोनेरी महाराष्ट्र स्पर्धेत जाझ्झ अप सलॉनचे ब्रँड टायटल पटकावले आहे. याशिवाय त्यांनी 'होणार सौंदर्यवती मी महाराष्ट्राची' या कार्यक्रमाचे परीक्षण केले होते. माय अर्थ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेच्या फॅशन शोमध्ये परीक्षक म्हणून स्वाती हनमघर यांनी काम पाहिले आहे. 


दरम्यान, यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरित होऊन युनिसिटी इंटरनॅशनल या कंपनीने त्यांना संधी देऊ केली. युनी सिटीची उत्पादने स्वतः वापरून त्यातून उत्तम फरक जाणवल्यामुळे स्वाती आता युनिसिटीमध्ये ब्युटी आणि वेलनेस (सौंदर्य आणि निरोगीपणा) सल्लागार म्हणून कार्यरत आहे. महामारीच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अनेक स्त्रियांना मार्गदर्शन केले. यामध्ये बिपी, शुगर, त्वचेच्या समस्या, वजन कमी-अधिक करण्यासाठी कशी जीवनपद्धती असली पाहिजे यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी सौंदर्यासाठी कष्ट घेतानाच निरोगी शरीराचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. हनमघर म्हणतात, लॉकडाऊनच्या काळात कित्येक स्त्रिया दिवसभर स्वयंपाकघरात काहीनाकाही काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. अशा स्त्रिया जेव्हा सौंदर्यासाठी माझ्याकडे विचारपूस करतात, त्यावेळी त्यांना सौंदर्याबरोबरच निरोगी आयुष्याचे धडे देते. केवळ चूल आणि मूल यामध्ये जीवन व्यतीत करण्यापेक्षा ती ऊर्जा स्वतःच्या भविष्यासाठी वापरून सक्षम होणे गरजेचे आहे. जर तुम्ही सक्षम असाल तर तुमचे कुटुंब सक्षम राहील. कारण निरोगी मनाने सौंदर्य अधिक खुलून दिसते यावर माझा विश्वास आहे, तोच विश्वास मी प्रत्येकीला देण्याचा प्रयत्न करते."


शिवाय कोरोना महामारीच्या काळात स्थानिक परिसरात स्वाती यांनी सॅनिटायझेशन आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच सामाजिक जाणिवेतून त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नर्मदा नदी काठच्या गरजूंना भोजन वाटप केले. तसेच त्या रक्ताचे नाते ट्रस्ट या रक्तपेढीच्या त्या सदस्यही आहे. हनमघर या बिजनेस नेटवर्क इंटरनॅशनल (बीएनआय) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सदस्य आहे. त्यांनी लग्नानंतर खऱ्या अर्थाने यशस्वीतेच्या दिशेने झेप घेतली. "लग्न झाल्यानंतर अनेक जबाबदाऱ्यांमुळे कित्येक स्त्रियांची स्वप्न मागे पडतात. पण जर आपण स्वतःसाठी धडपड केली नाही तर कुणीच करू शकणार नाही. त्यामुळे लग्नाच्या आनंदाच्या क्षणांना मी कर्तव्यनिष्ठपणे पार पाडले. एक मुलगा आणि मुलीच्या संगोपणाच्या काळात पूर्णवेळ गृहिणी बनून राहिले. पण आता मुलं मोठी होऊन त्यांच्या त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने यशस्वी निर्णय घेऊ लागले आहेत. या दरम्यान मी स्वतःला वेळ देऊन पुन्हा करीयरच्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली", असे त्या अभिमानाने सांगतात.


स्वाती हनमघर यांचे शुक्रवार पेठेतील माहेर असून सिंहगड रस्ता येथील माणिक बागेत त्यांचे सासर आहे. विशिष्ट घटनांनंतर आयुष्याची लढाई खूप कठीण होत जाते. त्यावेळी स्वप्न मागे पडतील अशी भीती वाटते. असा काळ हनमघर यांच्या आयुष्यात आला त्याबद्दल त्या सांगतात, एक काळ होता ज्यावेळी मी पूर्ण खचून गेले होते. परिवारावरील अकस्मात संकटामुळे मन कमकुवत झाले होते. परंतु या काळात मी विपश्यनेचा मार्ग अवलंबला. तेव्हा कळते, आपल्या समस्येतून बाहेर पडून आपणच संकटावर मात करण्यासाठी सक्षम व्हायला हवे. शरीर सक्षमतेबरोबरच साधना आणि चिंतन हे मनुष्याला मजबूत ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे बाह्य सौदर्यापेक्षा मानसिक सौंदर्य जपणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे सुंदर दिसण्याबरोबरच, योग्य आहार, योगा, प्राणायाम, साधना शरीराला खूप फायदेशीर आहेत." 


स्वाती हनमघर या केवळ सौंदर्य क्षेत्रापुरत्या मर्यादित न राहता त्या सामाजिक कार्यकर्त्या असून लायन्स क्लबच्या सदस्य आहे. याशिवाय महिलांकरिता कार्यरत असलेल्या उगम क्लबच्या सदस्या आहेत. भविष्यात स्वाती स्पा, सॅलॉन, स्टुडिओ आणि अकॅडमी यांचे एकत्रीकरण असलेला स्पॅलॉन उघडण्याचे नियोजन आहे. याशिवाय घरकामासाठी येणाऱ्या महिलांबाबत त्यांना काम करायचे आहे. याबद्दलचा प्रसंग सांगताना हनमघर म्हणतात, पाचवी-सहावीत असताना मी आमच्या घरी कामवाल्या ताई यायच्या, त्यांच्या मुलीला शालेय शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. तेव्हापासून समाजातील अन्यायकारक स्त्रियांचा आधार बनण्याची इच्छा आहे. कारण या स्त्रियांची क्षमता खूप कमालीची असते. परंतु त्यांना आधाराची गरज असते, तो आधार बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. आपण कोण आहोत, कशासाठी जन्माला आलो आहोत आणि काय करणार आहोत, याची जाणीव त्यांना झाली तर त्या आयुष्यात उत्तम भविष्याच्या दिशेने स्वतःला आणि त्यांच्या मुलांना नेतील."