नोकरीच्या अमिषातून पैसे उकळणाऱ्यांपासून सावध करणारा 'ट्रॅप्ड' लघुपट  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



नोकरीच्या अमिषातून पैसे उकळणाऱ्यांपासून सावध करणारा 'ट्रॅप्ड' लघुपट  


पुणे :- कोरोनामुळे देशासमोर उभ्या असलेल्या बेरोजगारीच्या संकटावर मात करण्यासाठी आज अनेक तरुण मिळेल ती नोकरी करण्यासाठी पुढे येत आहे. याचा गैरफायदा घेऊन अनेक ऑनलाईन कंपन्या नोकरीआधी नोंदणीचे पैसे आकारत आहे. कुठूनतरी रोजगाराची सोय होईल आणि हे संकट दूर होईल या आशेवर असलेले अनेक तरुण या फसवणुकीचे बळी ठरत आहे. या संकल्पनेला लघुपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणे गरजेचे असल्याचे मत ट्रॅप्ड लघुपटाचे निर्माते शुभम दळवी यांनी मांडले.


ऑनलाईन कंपन्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी जनजागृतीच्या हेतूने निर्माता, लेखक शुभम दळवी यांनी ट्रॅप्ड या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. लघुचित्रपटाची पत्रकार परिषद गुरुवारी पत्रकार संघात पार पडली. यावेळी सायबर सेलचे जयराम पायगुडे,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या समारंभ समिती च्या स्वाती हनमघर ,दिग्दर्शक तेजस रायभर, विनिता जावकर, पुष्पेंद्र जाधव, रोहिणी कोबळ उपस्थित होते. 


यावेळी बोलताना निर्माते दळवी म्हणाले, या कठीण काळात अनेक तरुणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे घरच्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्थिरस्थावर नोकरदार रस्त्यावर आले आहे. माझे जवळचे लोक आणि मित्रमैत्रिणी या फसवणुकीचे शिकार ठरले आहेत. कर्जाचे हफ्ते, उदरनिर्वाह, घरभाडे, पाणीपट्टी या सगळ्याची थकबाकी वाढत असल्यामुळे या भावनिक काळात कंपन्यांवर विश्वास टाकून अधिक मोठे संकट ओढवून घेत आहेत. 


पैसे भरून नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या कंपन्या विश्वासार्ह नसतात, हा संदेश या लघुपटाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा सौम्या प्रोडक्शनचा हेतू आहे. लोकांना सतर्क करण्यासाठी चित्रपटापेक्षा उत्तम माध्यम नाही. या महामारीच्या काळात काहींनी जीवावर उदार होऊन समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात दिला. परंतु दुसरीकडे काही माणसांनी या नाजूक परिस्थितीचा फायदा घेऊन अनेक तरुणांची उमेद धुळीस मिळवली आहे. शिवाय अशा घटनांबाबत फसवणूक झालेले लोक बदनामी होईल म्हणून पोलीस स्टेशन किंवा सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवण्याचे टाळतात. यामुळे हे बेकायदेशीर काम करणाऱ्या कंपन्यांना अधिक हुरूप येतो. त्यामुळे संपूर्ण खात्री केल्याशिवाय ऑनलाईन संकेतस्थळांवर आपली माहिती अथवा पैसे भरू नका. असे काही घडल्यास कशालाही न घाबरता सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन दळवी यांनी केले.