मालवाहतूकदार अडचणीतच! शिथिलीकरणानंतरही केवळ ६० टक्के व्यवसाय......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणाच्या प्रक्रियेला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी मालवाहतूक व्यवसायाचे गाडे अद्याप रुळावर आलेले नाही. गेल्या दोन महिन्यांत व्यवसायात केवळ २० टक्क्य़ांनी वाढ झाली असून, अद्याप ३० ते ४० टक्के वाहने उभीच आहेत. 


ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या आकडेवारीनुसार, राज्यातील छोटय़ा-मोठय़ा मालवाहतूक वाहनांची संख्या सुमारे १६ लाख आहे.


 बंदर आणि औद्योगिक क्षेत्रामुळे ही संख्या देशात सर्वाधिक आहे. 


टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा वाटा केवळ १५ ते २० टक्के इतकाच होता. 


टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दोन महिन्यांत ऑगस्टच्या सुरुवातीस मालवाहतुकीत २० ते २५ टक्क्य़ांनी वाढ झाली. 


तर गेल्या दोन महिन्यांत त्यामध्ये आणखी २० टक्क्य़ांची वाढ झाली. 


मालवाहू वाहनांची मागणी गेल्या दोन महिन्यांत हळूहळू वाढत असून, सध्या करोनापूर्व काळाच्या ६० ते ७० टक्के व्यवसाय होत असल्याचे, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी सांगितले. 


त्यातच कर्ज हफ्ते न भरण्याची सवलत रद्द झाल्यानंतर वाहतूकदारांच्या अडचणीत भर पडली आहे. 


यापुढील काळात हा व्यवसाय कसा सावरेल, याबाबत अद्याप कसलीच स्पष्टता नसल्याचे सिंह यांनी सांगितले. 


दुसरीकडे रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीला प्रतिसाद वाढत आहे. 


अद्यापही आयातीचे प्रमाण मर्यादित असल्याने बंदरावरील वाहतूकदारांची केवळ ५० टक्के वाहने सध्या कार्यरत असल्याचे, महाराष्ट्र हेवी व्हेईकल अ‍ॅण्ड इंटरसेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी सांगितले.


 संघटनेतर्फे जे.एन.पी.टी. येथे सुमारे १८ हजार मालवाहने आयात-निर्यातीसाठी मालवाहतूक करतात.