विद्यापीठ परीक्षेचा पोरखेळ सुरूच ; औषधनिर्माण शास्त्राच्या परीक्षा स्थगित; पहिल्या सत्रात होणार परीक्षा.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षांचा पोरखेळ पुन्हा गुरुवारीही पाहायला मिळाला. 


अनेक विद्यार्थ्यांचे लॉगिन उशिरा झाल्याने त्यांना पेपर सोडवण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचा वेळ मिळाल्याच्या तक्रारी आहेत.


तर व्होडाफोन-आयडिीााच्या नेटवर्क समस्येमुळे बहुतांश परीक्षांमध्ये गोंधळ निर्माण झाला. 


यामुळे औधनिर्माण शास्त्राचा शेवटच्या सत्रात असलेला पेपर स्थगित करून तो शुक्रवार १६ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता घेतला जाणार आहे.


 व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कमुळे नागपूर विद्यापीठाच्या सातव्या दिवशीच्या परीक्षांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागला. 


पहिला टप्पा सुखरूप आटोपल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा उशिरा सुरू करण्यात आल्यात.


 यातही बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉगिन करता आले नाही. 


व्होडाफोन-आयडियाचे नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांनी जीओ नेटवर्कचा वापर केला.


 त्यामुळे एकाच नेटवर्कवर सर्वाधिक भार आल्याने तेही सुरळीत काम करू शकले नाही. 


परिणामी दुसऱ्या सत्रातील ११.३० वाजताची परीक्षा १.३० वाजता सुरू झाली, तर दुपारी १.३० वाजता तिसऱ्या सत्राच्या परीक्षेलाही सुरुवात झाल्याने इतर विद्यार्थ्यांनीही लॉगिन करायला सुरुवात केली. 


एकाचवेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी परीक्षेला लॉगिन करत असल्याने गोंधळ निर्माण झाला. 


परिणामी अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित असल्याची माहिती आहे. 


या सर्व समस्यांमुळे शेवटच्या सत्रात असलेल्या परीक्षा घेणे अशक्य असल्याने विद्यापीठाने औषध निर्माणशास्त्राच्या परीक्षाच रद्द केल्या.