पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मराठीत बोलण्याची मागणी केल्याने मुंबईतल्या सराफाने दुकानाबाहेर ढकललं,
लेखिकेचा रस्त्यावर ठिय्या आंदोलन..........
मराठीत बोला अशी मागणी केल्याने मुंबईतील कुलाबा भागातल्या महावीर ज्वेलर्स मालकाने आपल्याला ढकलून दिलं असा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला आहे.
एवढंच नाही तर त्यांनी या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलनही पुकारले आहे. गुरुवारी दुपारपासून या लेखिका कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सबाहेर येऊन बसल्या आहेत.
शोभा रजनीकांत देशपांडे असं त्यांचं नाव आहे. मराठीत बोलण्याचा आग्रह धरल्याने महावीर ज्वेलर्स या दुकानदाराने आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली आणि दुकानाबाहेर ढकलून दिले असा त्यांचा आरोप आहे.
शोभा देशपांडे या गुरुवारी दुपारी कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावं अशी विनंती शोभा देशपांडे यांनी केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यात नकार तर दिलाच शिवाय दागिने देण्यासही नकार दिला.
तसंच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला आहे.
टी.व्ही. नाइन मराठीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
ज्वेलर्स दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केला आहे. त्यामुळे ज्वेलर्स दुकानदारावर जोवर कारवाई होत नाही तोवर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करणार आहे. सराफ आणि पोलीस या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शोभा देशपांडे यांनी केली आहे. शोभा देशपांडे यांनी थरारक सत्य इतिहास आणि इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू या दोन पुस्तकांचं संकलन केलं आहे. त्या एक वृत्तपत्रही चालवत होत्या. त्यांचे पती भारतीय नौदलात होते. शोभा देशपांडे या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी लढा देत आहेत.