पुणे प्रवाह न्युज पोर्टल
भंगार मालाची नोंद ठेवा ; अन्यथा कारवाई
पोलीस आयुक्त....
औद्योगिक परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी प्रयत्न....
पिंपरी – खरेदी करण्यात आलेल्या प्रत्येक मालाचा फोटो आणि रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करावी. तपासणीसाठी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला याची माहिती द्यावी, अन्यथा तो भंगार माल चोरीचा आहे, असे समजून कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. यामुळे शहरातील भंगार माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील उद्योजकांना त्रास देणारे माथाडी कामगार नेते, स्थानिक गुंड आणि भंगार माफिया यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड शहरात विशेषतः औद्योगिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून साहित्याची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा सर्व चोरीचा माल भंगार विक्रेत्यांना विकला जात असल्याची दाट शक्यता आहे. जर भंगार विक्रेत्याने हा माल खरेदीच केला नाही तर चोरीला आळा बसेल, असा विश्वास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना वाटत आहे. यामुळेच त्यांनी भंगार विक्रेत्यांसाठी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीमध्ये भंगार विक्रेत्याच्या दुकानात असलेल्या प्रत्येक मालाचा फोटो त्यांने खेरदी करताना काढणे गरजेचे आहे. तसेच खरेदी केलेला माल कोणाकडून खरेदी केला आहे त्याचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक याचीही नोंद भंगार विक्रेत्याने रजिस्टरमध्ये ठेवणे बंधनकारक आहे.
काही ठराविक पोलिसांना भंगार विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यास सांगितले जाणार आहे. या तपासणीमध्ये रजिस्टरमध्ये नोंद नसलेला माल आढळून आला तर तो चोरीचा असल्याचे समजून जप्त केला जाईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. यामुळे प्रत्येक भंगार विक्रेत्याने यापुढील काळात सर्व प्रकारच्या मालाची नोंद करावी, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. यामुळे शहरातील भंगार माफिया आणि चोरी करणाऱ्या टोळ्या यांच्यात खळबळ उडाली आहे.