राज्यात आलेल्या सत्तेमुळे आलेली मरगळ झटका- आमदार थोरवे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पक्षाने आदेश दिल्यास शिवसेना पक्ष आघाडीचा धर्म पाळणार


 कर्जत.ता.22 गणेश पवार


                           राज्यात शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री आहेत आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचा आमदार शिवसेना पक्षाचा आहे.त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाचा गाडा वेगाने धावायला हवा होता.मात्र सत्ता आणि आपल्या पक्षाचा आमदार झाल्याने शिवसैनिक आणि पक्षाचे पदाधिकारी यांना आता आपली जबाबदारी संपली असे वाटू लागले आहे आणि त्यातून पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्यात मरगळ आली आहे.ही मरगळ वेळीच बाजूला करण्याची गरज असून आपले स्वप्न पूर्ण झाले असले तरी आपण घरी बसून चालणार नाही असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केले.दरम्यान,शिवसैनिकांनी मतदारांना निवडणुकीच्या काळात जी आश्वसने दिली आहेत,त्यांची पूर्तता करण्यासाठी आणि आपल्या सरकारच्या सर्व योजना गावागावात राबविण्यासाठी सर्वांनी कामाला लागायला हवे असे मत आमदार थोरवे यांनी मांडले.तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघात पक्षानेतृत्वाने आदेश दिल्यास आगामी निवडणुका मित्र पक्षांसोबत आघाडी करून लढवाव्या लागतील हे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ठ केले.


                            कोरोना मुळे लावण्यात आलेल्या लॉक डाऊननंतर प्रथमच शिवसेनेच्या तालुका कार्यकारिणीची बैठक आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यालयात लावण्यात आली होती.सुरुवातीला आमदार महेंद्र थोरवे हे कोरोनावर मात करून पुन्हा सामाजिक जीवनात सक्रिय झाल्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला जिल्हा सल्लागार भरत भगत, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष भोईर,तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,तालुका संघटक शिवराम बदे,युवासेना तालुका अधिकारी अमर मिसाळ,तालुका पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे,जिल्हा परिषद सदस्या सहारा कोळंबे,तसेच उपतालुका प्रमुख,जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख, पंचायत समिती गटाचे विभागप्रमुख,शहरप्रमुख, युवासेनेचे पदाधिकारी,आदी तालुका कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.सुरुवातीला तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी पक्षाच्या तालुक्यातील कामाचा आढावा प्रास्ताविक करताना घेतला.नंतर जिल्हा सल्ला गार भरत भगत यांनी अजूनही शाखाप्रमुख यांना निमंत्रणे देताना भेदभाव केला जात असून त्यात उपतालुका प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्याकडून पक्षांतर्गत राग दाखविला जात आहे आणि हा पक्षाच्या बळकटीला धोका देऊ शकतो अशी सूचना केली.आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात कर्जत तालुक्यातील आपण कोरोना मुळे एकत्र आलो नाहीत,पण निवडणूक काळात आपण मतदारांना जी आश्वासने दिली आहेत,त्यांची पूर्तता करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी हे आपल्याकडे विकास कामे घेऊन येत नाहीत.त्याचवेळी अनेक पदाधिकारी हे सहा महिन्यात आपल्या कार्यालयात आले देखील नाहीत.त्यामुळे जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी उपतालुका प्रमुख यांनी गटातील तिन्ही विभागप्रमुख यांना सोबत घेऊन आपल्या गटातील सर्व शाखाप्रमुख यांची भेट घ्यावी आणि त्यातून विकास कामांची यादी तयार करावी अशी सूचना यावेळी केली.


                          आगामी जिल्हा परिषद निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत,हे लक्ष्यात घेता आपल्या भागात विकास कामे झाली पाहिजेत यासाठी पदाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा.त्यात राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे प्रमुख हेच असल्याने जनतेला देखील मोठ्या अपेक्षा आहेत.ही बाब लक्षात घेऊन सध्या सुरू असलेल्या पावसामुळे झालेले नुकसान यांचे पंचनामे आपल्या पक्षाच्या पातळीवर पदाधिकारी यांनी प्रत्येक गावात शेतात जाऊन करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या कार्यालयाकडे आणून द्यावेत.पुढे त्या सर्वांना त्यांच्या पिकाची वस्तुनिष्ठ झालेली नुकसानीची भरपाई देण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि त्यासाठी सर्वांनी सक्रिय व्हा असे आवाहन देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.तालुक्यातील पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी हा दर आठवड्याला कार्यलयात आलाच पाहिजे आणि त्यांनी आपल्या विभागातील कामांची यादी तसेंच तेथील अडचणी यांची माहिती दिली पाहिजे. त्यावेळी आपल्या कार्यालयात आल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसेल तर आपल्याला सांगावे असे आवाहन देखील केले.पण आपले कार्यकर्ते सुस्तावले आहेत हे मान्य करावे लागेल असे मत मांडून आपल्याला हक्काचा आमदार 15वर्षांनी मिळाला आहे.आणि राज्यात सत्ता देखील आली आहे,त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्याना आपली जबाबदारी संपली असे वाटले असेल,परंतु आता राज्यात पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्याने सर्वांनी आळस झटकून विकास कामे करून घेण्यासाठी सक्रिय व्हावे असे आवाहन महेंद्र थोरवे यांनी केले.


                        पक्षाच्या तालुक्यातील सर्व  पदाधिकारी यांनी आपल्या सरकारच्या योजना समजून घेतल्या पाहिजेत. त्यात सर्व शासकीय कार्यालयात जाऊन किंवा आपल्या येथे कार्यालयात येऊन योजना समजून घ्याव्यात आणि महाविकास आघाडी काय काम करते याबाबत आपल्या गावागावात माहिती द्यावी असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.तर तालुक्यातील तरुणांना खालापूर आणि खोपोली येथील औद्योगिक वसाहतीत काम मिळाले पाहिजे यासाठी सर्व कंपन्याबरोबर संघर्ष सुरू आहे.त्याचवेळी खालापूर तालुक्यात 1600 एकर जमिनीवर नवीन औद्योगिक वसाहत आणली जात आहे,त्यामुळे आपल्याकडे एमआयडीसी नसल्याने नोकरी नाही याचा बाऊ न करता स्थानिकांना कामावर घेतलेच पाहिजे याबाबत आपले नियोजन सुरू असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा होतकरू तरुणांना नोकरी साठी आवाहन करून त्यांचे बायोडेटा आपल्या कार्यालयात आणून द्यावेत अशी सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी केली.तर कोरोना मुळे आपला आमदारनिधी यावर्षी मिळणार नाही,पण एमएमआरडीए,25/15,जिल्हा नियोजन,नगरविकास मधील निधी कर्जत विधानसभा मतदारसंघात आणला आहे ही माहिती देखील पदाधिकारी यांनी समजुन घेतली पाहीजे आणि सर्वांना सांगितली देखील पाहिजे अशी सूचना थोरवे यांनी केली.


फोटो ओळ 


कोरोनवर मात केल्याने आमदार थोरवे यांचा सत्कार तालुका कार्यकारिणी च्या बैठकीत करण्यात आला