रेल्वेसेवा बंद असल्याने रिक्षा व्यवसायाला उतरती कळा ; करोनच्या भीतीने प्रवाशांमध्ये घट...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 विरार : टाळेबंदीनंतर सध्या हळूहळू परिस्थिती सामान्य होत आहे, परंतु अजूनही अनेक व्यवसाय टाळेबंदीच्या आर्थिक नुकसानीच्या झळा सोसत आहेत. त्यात शासनाने अद्याप लोकल सेवा सुरू न केल्याने चाकरमान्यांवर अवलंबून असलेल्या रिक्षा व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. करोनाच्या भीतीनेही रिक्षा प्रवासी संख्या प्रचंड घटली असल्याने रिक्षा व्यवसायात मंदी आली असून, रिक्षाचालक चिंतेत आहेत. हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांचे टाळेबंदीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 


वसई-विरार शहरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रपाणावर आहे. ३० हजारहून अधिक रिक्षाचालक वसईत रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यामधील अनेक रिक्षाचालक भाडय़ाच्या घरांमध्ये वास्तव्य करीत असून, भाडय़ाच्या रिक्षा चालवितात. मागील पाच महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले होते.  वसई-विरारमधील बहुतांश व्यवसाय हा कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांवर अवलंबून आहे. पण अद्याप रेल्वे सेवा सुरू झाली नसल्याने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश असल्याने पण त्यातही प्रवासी कोविड १९च्या भीतीने रिक्षात प्रवास टाळतात त्यामुळे ते खासगी वाहने, तसेच बसने प्रवास करत आहेत. प्रवासी नसल्याने दिवसाचा धंदा निम्म्याहून कमी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याशिवाय रेल्वे स्थानकात ये-जा करणारे इतर प्रवासी नाहीत. त्यामुळे शहरातील रेल्वे स्थानकाबाहेरील अनेक रिक्षा स्टॅंण्ड ओस पडले आहेत. लोकल सेवा बंद असल्याने रेल्वे स्थानकांपर्यंत रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी नसल्याने, तसेच बस थांबे जवळच असल्याने रिक्षाचा प्रवास टाळला जात आहे.