अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्त डेविड जे. रान्झ यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्त डेविड जे. रान्झ यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट 


पुणे, दिनांक २४ नोव्हेंबर २०२० : 


आंतराष्ट्रीय विद्यापीठांना भारतीय विद्यापीठांशी जोडले जाण्यासाठी व्यापक संधी उपलब्ध होतील, अशी घोषणा 


नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेली आहे. या घोषणेमुळे अमेरिकेतील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था भारतीय विद्यापीठांशी जोडले जाण्याबाबत अधिक उत्सुक आहेत. 


याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्त डेविड जे. रान्झ यांनी सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये चर्चा केली. यावेळी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) नितीन करमळकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामधील उल्लेखनीय बाबींची माहिती उच्चायुक्त डेविड जे. रान्झ यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, इंटरनॅशनल लिकेजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार आदी मान्यवर सहभागी झाले होते. 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु होणारे 'सेंटर फॉर मॉलिक्युलर डायग्नॉस्टीक' हे संशोधन केंद्र आणि विद्यापीठातर्फे संसर्गजन्य रोगांवर केले जाणारे संशोधन याबाबत जाणून घेतल्यानंतर अमेरिकेच्या दूतावासातील रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र व पुणे विद्यापीठ एकत्रितरित्या या विषयावर काम करू शकतात, असे उच्चायुक्त डेविड जे. रान्झ यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारखे दर्जेदार विद्यापीठाशी जोडले जाण्याबाबत अनेक अमेरिकन संस्था, विद्यापीठे उत्सुक आहेत, त्यामुळे अशा संस्थांसोबत पुणे विद्यापीठाने योग्य समन्वय साधावा, असेही उच्चायुक्त डेविड जे. रान्झ यांनी यावेळी सांगितले.


----------------------------


पश्चिम भारतातील विद्यापीठांना शैक्षणिक अभ्यासक्रम विकास, नवीन तंत्रज्ञान याबाबत सहाय्य करण्यासाठी अमेरिका खूप उत्सुक आहे. 


- डेविड जे. रान्झ


 अमेरिकन उच्चायुक्त 


-----------------------------


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमेरिकेतील विद्यापीठांसोबतचे संबंध आणखीन दृढ व्हावेत या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या काळात अमेरिकेतील विद्यापीठासोबत ब्लेंडेड अभ्यासक्रम, लिबरल आर्टस् आणि संयुक्त संशोधन उपक्रम याबाबत जोडले जाण्याचा आमचा मानस आहे. 


- प्रा.(डॉ.) नितीन करमळकर


 कुलगुरू 


  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 


-------------------------------------


 विविध अमेरिकन विद्यापिठांसोबत संशोधन उपक्रम, शैक्षणिक विकास याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अमेरिकन दूतावास मार्फत संयुक्तरित्या काम केल्यामुळे भारत व अमेरिका या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ होतील. 


- डॉ. अपूर्वा पालकर 


संचालिका 


इंटरनॅशनल लिंकेजेस,


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ