निःस्पृह भावनेने काम करणाऱ्या संस्थांची गरज सतेज पाटील यांचे प्रतिपादन; महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाला सदिच्छा भेट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



निःस्पृह भावनेने काम करणाऱ्या संस्थांची गरज


सतेज पाटील यांचे प्रतिपादन; महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाला सदिच्छा भेट


पुणे : "मागासवर्गीय, वंचित घटकांतील, गरीब मुलांना ज्ञानदान करण्याचे कार्य महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ गेल्या नऊ दशकांहून अधिक काळ करत आहे. समाजाच्या कल्याणासाठी निःस्पृह भावनेने काम करणारी ही एक संस्था असून, अशा संस्थांची समाजाला गरज आहे," असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहर) राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.


महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय येथील कार्यालयास सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहनदादा जोशी, मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रथमेश आबनावे, गौरव आबनावे, प्रज्योत आबनावे, पॅट्रोन्स भागुजी शिखरे, विकास दळवी, धोंडिबा तरटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


संस्थेचे दिवंगत सचिव डॉ. विकास आबनावे यांच्या स्मृतींनाही सतेज पाटील व मोहन जोशी यांनी उजाळा दिला. प्रसाद आबनावे व सहकाऱ्यांनी पाटील यांचा स्वागत सत्कार केला. तसेच कोरोना, शिक्षण संस्था, शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी, शैक्षणिक सुधारणा अशा विविध मुद्यांवर चर्चा केली. प्रथमेश आबनावे यांनी संस्थेच्या कार्याविषयी, तसेच 'नवी उमेद, नवी दिशा, विकासपर्व मिशन १००' या अभियानाची माहिती दिली. 


सतेज पाटील यांनी संस्थेमार्फत होत असलेल्या ज्ञानदानाच्या कामाचे कौतुक केले. शिक्षण संस्थांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कायमच सकारात्मक असून, अशा निःस्पृह संस्थांना कोणतीही मदत लागली, तर ती दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मोहन जोशी यांनी डॉ. विकास आबनावे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


----------------


महाविकास आघाडीला पाठिंबा


विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आजगावकर यांना महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळतर्फे जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला.