पुणे प्रवाह न्युज पोर्टल
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय..
निसर्गराजा गणपती नावाने फेमस
गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
कर्जत,ता.19 गणेश पवार
माथेरान डोंगरातून चालणाऱ्या मिनिट्रेनवर मोटरमन असलेले राजाराम खडे यांना आपल्या 20 वर्षाच्या या नॅरोगेज मार्गावरील प्रवासात एक भला मोठा दगड खुणावत होता.त्या खडकरूपी दगडाला खडे यांनी आपल्या बुद्धिप्रामाणे आकार दिला आणि तेथे एक दगडामध्ये कड्यावरचा गणपती आकारास आला.55-60 फूट उंचीचा हा दगडी बाप्पा निसर्गराजा गणपती या नावाने प्रसिद्धीला आला आहे. दरम्यान,गणेशोत्सव काळात आणि माघ महिन्यात गणेशोत्सव काळात गर्दी खेचणारा हा कड्यावरचा गणपती लॉक डाऊन मध्ये जास्त लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.त्या 55 फूट गणपती बाप्पाच्या पायाशी लहान गणेश मूर्ती स्थापित केली आहे,त्या मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिहासनावर बसलेला पुतळा बसविण्यात आला आहे,त्या पुतळ्याचे अनावरण 20 डिसेंबर 2020 रोजी विधिवत होणार आहे.
नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावर चालणाऱ्या मिनीट्रेनचे मोटरमन राहिलेले राजाराम खडे यांनी विकटगडचा रस्ता बनविण्यात आणि कड्यावरचा गणपती साकारण्यात महत्वाची भूमिका बजावली. नेरळ-माथेरान दरम्यान मिनी ट्रेनचे इंजिन चालवणा-या राजाराम खडे यांना आपल्या श्रद्धेनुसार आसपास च्या कड्यांमध्ये गणपतीचा आकार नेहमी भासत होता.मिनी ट्रेन चालवताना पेब किल्ल्याजवळ एक मोठा कडा त्यांच्या नजरेस यायचा.या कड्यास त्याकाळी ‘मिठाचा खडा’असं नाव होतं.कारण खड्याचे मीठ ज्याप्रमाणे आजूबाजूला ओबडधोबड असते,त्याप्रमाणे तो कडा दिसायचा.
या कड्याकडे पाहिल्यानंतर त्यांना त्यात गणपतीचा आकार असल्याचा भास व्हायचा.एकदा नेरळहून ट्रेन चालवताना राजाराम दादा चालवत असलेल्या इंजिनात एक उंदीर शिरला.तो मूषक मिनीट्रेन मिठाच्या कड्याच्या जवळून जात असताना त्या उंदीरमामाने इंजिनमधुन टुणकन उडी मारुन बाहेर पडला.राजाराम खडे यांना हा दैवी संकेत वाटला आणि त्यांनी पुन्हा त्या कड्याकडे बघितले.
निरखुन पाहिल्यावर त्या खडकांमध्ये त्यांना गणपतीचा आकार दिसला.त्या दिवसापासून राजाराम अस्वस्थ झाले, बेचैन झाले.शेवटी त्यांनी आपल्या सोबत गाडीवर काम करणाऱ्या ब्रेक पोर्टर यांना याबाबत माहिती दिली.मग सर्व कामगारांना आणि स्थानिकांना कड्यामध्ये गणपती साकारायची कल्पना सांगितली.मिनिट्रेनबरोबर वर्षानुवर्षे रेल्वेत मध्ये काम करत असलेल्या सहकर्मचा-यांना सुद्धा त्यांनी ही कल्पना आवडली. सगळ्यांनी राजाराम खडे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
2004 मध्ये राजाराम खडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सर्वांना सोबत घेऊन कड्यावर गणपती निर्माण करायची मोहीम हाती घेतली.सुरुवातीला लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने कड्यावरील खडकांना गणपतीच्या तोंडाचा आकार देण्यात आला. नंतर गणपतीचे हात आणि हातांमध्ये असणारी आयुधं खडकांमध्ये निर्माण केली गेली.
जवळपास 14 वर्षानंतर 2018 साली 52 फूट उंच असा कड्यावरचा गणपती पूर्णत्वास आला.गणपतीच्या पायाखाली भव्य असा म्हणजे तब्बल 7-8 फूट उंचीचा उंदीरमामा सिमेंटचा बनवून घेण्यात आला.लोकांना दर्शन घेता यावं म्हणुन कड्यावरच्या गणपतीच्या पायथ्याशी छोटंसं मंदिर बनवण्यात आले असुन गणपतीच्या छोट्या प्रतिकृतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.माथेरानला निसर्गाच्या कुशीत असलेल्या या गणरायाला ‘निसर्गराजा गणपती’ हे नाव दिले गेले आहे.माथेरानजवळ असणारा पेबचा किल्ला अर्थात विकटगडला वर्षभरात असंख्य गिर्यारोहक भेट देतात. विकटगडावर जायच्या आधी गिर्यारोहक या गणपतीचं दर्शन घेऊन पुढे वाटचाल करतात.राजाराम खडे यांच्या गणपतीवरील श्रद्धेने साकारला आहे.खडे यांच्याच बरोबर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या कोणाच्याही घ्यानिमनी नसताना 55-60फूट आकारात भव्यदिव्य गणपती निर्माण झाला आणि बाप्पाच्या आशीर्वादाने ही कलाकृती आपल्या सर्वांच्या हातातून साकारली आहे असे खडे यांना वाटते.
राजाराम खडे पाच वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत.पण उन्हाळा असो की पावसाळा,हिवाळा असो की आणखी काही दर मंगळवारी आणि आठवड्यात दोनदा ते कड्यावरच्या गणपतीच्या सानिध्यात असतात.तेथे रंगरंगोटी मारणं,परिसराची निगा राखण्याचं काम स्वखर्चाने आणि भावनिक होऊन आत्मीयतेने करत असतात.लोकं जेव्हा श्रद्धेने येऊन दर्शन घेतात,तेव्हा इतकी वर्ष केलेल्या मेहनतीची पोचपावती मिळते आणि येणाऱ्या भाविकांनी आपल्या मित्रांना कुटुंबियांना घेऊन यावे असे आवाहन देखील ते करीत असतात.सत्तरी कडे झुकलेले खडे यावर्षी निसर्ग राजा गणपतीला नव्याने रंगरंगोटी करण्यात एकरूप होऊन गेले होते.लॉक डाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी दररोज तेथे आपली उपस्थिती लावली आहे. त्यासाठी नेरळ येथून दुचाकी घेऊन येणारे खडे हे नॅरोगेज ट्रकने दररोज पाच किलोमीटरची पायपीट करून तेथे पोहचत आहेत.त्यात यावर्षी सर्वाधिक भक्तांनी कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेतले.कारण मार्च पासून सर्व लोक घरी आहेत,आणि एक वेगळे ठिकाण पाहायला मिळणार म्हणून कड्यावरच्या गणपतीची वाट धरतात.गणपती च्या बाजूने नवीन पनवेल,नवी मुंबई देखील न्याहाळता येते.
कसे जाल
नेरळ-माथेरान घाट मार्गाने आपली वाहने घेऊन जाता येते.वाहने वॉटर पाईप स्टेशन पासून पुढे रस्त्याच्या मधून जाणाऱ्या रेल्वे ट्रक च्या बाजूला उभी करून ट्रकचा रस्ता पकडून जाता येते.मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकावरून माथेरान ला जायला टॅक्सी मिळतात,त्या टॅक्सीनी गेल्या वर अर्ध्या घाटात कड्यावरचा गणपती आणि पेब किल्ल्या कडे माथेरान ट्रेन च्या ट्रॅक वरून जातो अर्ध्या तासात आपण गणपती जवळ पोहचतो.ही पायवाट सव्वा दोन किलोमीटर लांबीची आहे.