पुणे प्रवाह न्युज पोर्टल
नव्या शिक्षण धोरणामुळे देशाला नवी दिशा
मणिपूरच्या राज्यपाल डॉ. नजमा हेपतुल्ला यांचे विचारः ऑनलाईन चार दिवसीय ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन
डॉ. के. कस्तुरीरंगन व डॉ. जगदीश गांधी यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’
पुणे,दि.15 डिसेंबर:“देशाच्या प्रगतीसाठी वर्तमानकाळात नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अत्यंत गरज आहे. 21 व्या शतकात देशाला दिशा देण्यासाठी ते महत्वाचे आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या लोकशाही देशात शिक्षणाची सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, समग्र शिक्षण, नीतिशास्त्र व कायद्याचे ज्ञान देणेसुद्धा गरजेचे आहे.” असे विचार मणिपूरच्या राज्यपाल डॉ. नजमा हेपतुल्ला यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे दि. 15 ते 18 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित ऑनलाईन चौथ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020ः उपलब्ध संधी’ हा या परिषदेचा मुख्य विषय आहे.
या समारंभासाठी माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पद्मविभूषण डॉ. मुरली मनोहर जोशी, कन्साई जपान इंडिया कल्चर सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. टोमियो मिझोकामी, दिल्ली येथील युनेस्कोचे संचालक आणि भारत व इतर देशांचे युनेस्कोचे प्रतिनिधी एरिक फाल्ट, सिटी मॉन्टेसरी स्कूलचे संस्थापक व्यवस्थापक व मुख्य न्यायधीशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. जगदीश गांधी आणि सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी डॉ. जगदीश गांधी व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के.कस्तुरीरंगन यांना ‘जीवन गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस व प्रा. सुहासिनी देसाई हे उपस्थित होते.
डॉ. नजमा हेपतुल्ला म्हणाल्या,“ मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वासाठी व प्रगतीसाठी मातृभाषेतून सर्वांना शिक्षण देण्यात यावे. तसेच, व्यावासायिक व पर्यावरण विषयक ज्ञान असलेले शिक्षण द्यावे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उच्च शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल घडावयास हवेत. जेणे करून देश विदेशातील विद्यार्थी येथे येऊन शिक्षण घेतील. या देशाला तक्षशिला आणि नालंदा सारख्या विद्यापीठांची परंपरा आहे. ती आता परत आणण्याची वेळ आली आहे.”
डॉ. मुरली मनोहर जोशी म्हणाले,“शांतीपूर्ण समाज निर्मितीसाठी शिक्षण महत्वाचे आहे.त्यासाठीच प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली या दिशेने पाऊले टाकले गेले होते. शिक्षण हेच देशाच्या प्रगतीचे द्योतक आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हा त्याचा गाभा आहे.21 व्या शतकात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची विशेष गरज आहे. यामध्ये विज्ञानाला अग्रक्रम दिला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे सुद्धा एक महत्वाचे क्षेत्र आहे. हे धोरण औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा उपयुक्त आहे. तत्वज्ञानावर आधारलेल्या शिक्षणाचे धोरण हे चिरकाल टिकून राहील. त्यासाठी आम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे आणि त्या दिशेनेे प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण संस्थांनी विद्यार्थी घडविण्यावर भर देऊन नीतिमत्ता व मूल्यांचे शिक्षण द्यावे. त्यातून वसुधैव कुटुम्बकम अशी भावना समाजात निर्माण होईल. भारतात विज्ञानाची थोर परंपरा होती पण ती आता लुप्त झाली आहे. तिचे पुनरुजीवन केले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता बाणवली गेली पाहिजे.”
प्रा.डॉ. टोमियो मिझोकामी म्हणाले,“राष्ट्रीय शिक्षण नीति 2020 मध्ये डिजिटल शिक्षणावर अधिक भर दिला गेला आहे. शिक्षणाची भाषा ही मातृभाषेतूनच असून ते 8वी पर्यंत करावे. त्यासाठी शासनाला प्रयत्न करावे लागतील. भारतीय भाषा या समृद्ध, वैज्ञानिक व सुंदर भाषा असून त्यात आधुनिक साहित्य व गद्य आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेला अधिक महत्व देऊ नये. देशाच्या विकासासाठी मातृभाषा महत्वपूर्ण आहे. देशातील विचारवंतांचे म्हणणे आहे की शिक्षण व ज्ञानासाठी मातृभाषाच हवी. येथील संगीत, शिक्षण, फिल्म हे हिंदीत असून संपूर्ण जगावर राज्य करीत आहे. त्यामुळे देशात मातृभाषेला अधिक महत्व द्यावे. महात्मा गांधी यांनी सुद्धा मातृभाषेत शिक्षण देण्यावर भर दिला होता. आजच्या काळात सरकारी व खाजगी शाळेतील शिक्षणाची व भाषेची जी दरी पडली आहे ती कमी करावी लागेल.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ उद्याचे शिक्षक घडविणारी ही कार्यशाळा आहे. आपल्या देशात 4 हजार वर्षापासून ज्ञानदानाचा प्रवाह चालत आलेला आहे. रामायण व महाभारत काळात विकसित झालेली ही संस्कृती अजूनही टिकून आहे. याच संस्कृतीचे शिक्षण शाळा व कॉलेजमधून दिले गेले पाहिजे. आता परत ज्ञानाधिष्ठित समजाचे पुनरुजीवन होणे गरजेचे आहे. नवे शैक्षणिक धोरण हे भक्कम पायावर उभे राहिले पाहिजे. संशोधन आणि विवेकशीलता ही प्रक्रिया शिक्षण क्षेत्रात सतत चालू राहिली पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातूनच भारत भविष्यात विश्वगुरू बनेल.”
डॉ. जगदीश गांधी म्हणाले,“तिसर्या महायुद्धाची टांगती तलवार असतांना शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण जगात शांतीचा संदेश दिला जात आहे. अशा वेळी सरकारने नवी शिक्षण पद्धती आणली आहे. त्यामुळे 21 व्या शतकात शिक्षणाचा आशय हा संपूर्णपणे वेगळा असणार आहे. नेल्सन मंडेला म्हणाले होते की जग बदलण्यासाठी शिक्षण हे एक महत्वाचे साधन आहे. ही अशी शक्ती आहे की देवा पासून दानवापर्यंत सर्वांना घडविण्याचे कार्य करते. आई वडील हे पहिले शिक्षक आहेत. तसेच, विद्यार्थ्याना आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे कार्य शिक्षक करू शकतात. शिक्षण हे चांगला नागरिक घडविणे व विद्यार्थ्यांमधील सुप्त शक्ती प्रकट करण्याचे काम करते.आजच्या काळात विद्यार्थ्यांना सर्व धर्माचा परिचय करून देणे गरजेचे आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. कोरोना रूपी अजगराने संपूर्ण जगाला विखळा घातला आहे. एक शिक्षक या नात्याने मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करणे आता आवश्यक बनले आहे. याचा उपयोग जगातील सर्व लोकांना होईल. आज देशामध्ये कॉन्शसनेसची स्कूल सुरू करणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैश्विक मुल्याधिष्ठीत शिक्षण पध्दतीचा स्विकार केला पाहिजे.”
एरिक फाल्ट म्हणाले,“ भारतातील उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण असून ते संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. देशात 1991 पासून उच्च शिक्षण घेण्यासाठी येणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतातील अभियंत्यांची गुणवत्ता संपूर्ण जगात सिद्ध झाली आहे. देशात जी नवीन शिक्षण पद्धती आली आहे ती अतिशय महत्वाकांक्षी आहे. येथील शिक्षक वर्गसुद्धा विद्वान आहे.”
राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने नॅशनल टीचर्स काँग्रेसचे आयोजन केले आहे. यावेळी त्यांनी या कॉग्रेसच्या पाठीमागची संपूर्ण भूमिका समजावून सांगितली. भारतीय परंपरेत गुरू शिष्यांच्या नाते संदर्भातील माहिती देऊन राष्ट्र निर्मितीसाठी गुरूंची भूमिका किती महत्वाची आहे, हे ही सांगितले.
प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी नॅशनल टीचर्स काँग्रेसची सविस्तर माहिती दिली. डॉ. एन.टी.राव यांनी टीचर्स कॉग्रेसचा तपशील सांगितला.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्रनाथ पाटील यांनी आभार मानले.