सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन जिमखाना यांच्यात सामंजस्य करार

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन जिमखाना यांच्यात सामंजस्य करार

*पुणे :-* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन जिमखाना यांच्यात क्रीडा व्यवस्थापन व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दि. १४.१२.२०२० रोजी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी डॉ. नितीन करमाळकर, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, डॉ. अपूर्वा पालकर, संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहवर्य, श्री मिहीर केळकर, श्री. विश्वास लोकरे, सरचिटणीस, डेक्कन जिमखाना, श्री. श्रीरंग गोडबोले हे उपस्थित होते.

या कराराद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये क्रीडा विषयक नाविन्यपुर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण डेक्कन जिमखाना उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी आवश्यक सुविधा विद्यापीठातर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. क्रीडा व क्रीडा व्यवस्थापन या विषयात नवकल्पना व नवप्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम मंडळाद्वारे कार्यक्रम विविध कार्यान्वित करण्यात येणार आहेत तसेच त्यांना मार्गदर्शन डेक्कन जिमखाना येथील क्रीडा तज्ज्ञ यांचेकडून देण्यात येणार आहे.

विद्यापीठ व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा व क्रीडा व्यवस्थापन या विषयावर सेमीनार, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. डेक्कन जिमखाना सन १९०२ पासून क्रीडा विषयक प्रशिक्षण देत असून तेथून अनेक नामवंत खेळाडू

तयार झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मी. रनिंग ट्रॅक, जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, इनडोअर स्पोर्टस एरिना तयार करण्यात आला असून विद्यापीठातील तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी त्याचा वापर करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या धर्तीवर क्रीडा व क्रीडा व्यवस्थापन विषयक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविण्यात आवश्यकता असून या सामंजस्य कराराच्या माध्यमातून असे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. डेक्कन जिमखाना यांच्या देश, विदेशातील क्रीडा क्लबच्या असलेल्या संलग्निकरणाचा फायदा या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होईल,

"क्रीडा विषयक दर्जेदार व व्यावसायिक प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना अत्यंत गरजेचे आहे. विद्यापीठाने सर्व क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्जाची कामगिरी केली असून क्रीडा विषयात या कराराद्वारे उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होईल." डॉ. नितीन करमाळकर, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

"क्रीडा विषयक नाविन्यपुर्ण स्टार्टअप ही काळाची गरज आहे. या सामंजस्य कराराद्वारे क्रीडा विषयक नवकल्पनांना प्रोत्साहन मिळून नवउद्योजक तयार करण्यास मदत मिळेल डॉ. अपूर्वा पालकर, " संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन जिमखाना या दोन नामवंत संस्था एकत्र येउन काहीतरी भरीव कार्य करतील ही खात्री आहे." विश्वास लोकरे, अध्यक्ष डेक्कन जिमखाना