पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*अटल भूजल योजनेंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन*
पुणे, दि.5- भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी 'अटल भूजल योजना राज्यात १ एप्रिल २० पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमध्ये विविध विभागातील तज्ञांचा तसेच अशासकीय संस्था यांचा समावेश आहे. या सर्व अशासकीय संस्था तसेच अंमलबजावणी यंत्रणा, जागतिक बँक प्रतिनिधी आणि केंद्र शासनाचे या योजनेंतर्गत कार्यरत असलेले अधिकारी यांची सर्वसमावेशक अशी चर्चा घडवून आणण्याकरिता राज्य समन्वय व अंमलबजावणीकरिता नियुक्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
या वेबिनारचे उद्घाटन , पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
डॉ. चहांदे म्हणाले, राज्यातील अस्तित्वात असलेल्या सुमारे 37 हजार पाणी पुरवठ्याच्या स्रोतांचे संरक्षण व शाश्वततेकरिता अधिकाधिक भूजल व्यवस्थापनाकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच राज्यात अटल भूजल योजना व जलजीवन मिशन या दोन्हीच्या माध्यमातून पेयजल टंचाईवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान आधारीत उपाययोजना तसेच सुक्ष्म नियोजनाची आवश्यकता असल्याचे मत देखील डॉ. चहांदे यांनी व्यक्त केले. याबरोबरच शासनाच्या कृषी, जलसंधारण, सिंचन इत्यादी विभागांनी एकत्रित येऊन प्रयत्नपूर्वक भूजल व्यवस्थापनाकरिता आराखडा तयार करुन त्यावर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही केले.
यानंतर प्रास्ताविकपर भाषणात यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाणी या विषयावर अधिक विचारमंथन होणे आवश्यक असल्याने विविध तज्ञ एकत्रित येऊन यावरील पुढील दिशा ठरविण्याकरिता वेबिनारच्या माध्यमातून चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न असल्याचे डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले. या वेबिनारमध्ये भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने पुणे, सातारा व जळगांव या जिल्हयांचे लोकसहभागाधारीत भूजल व्यवस्थापन विषयी राबविण्यात आलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
तंत्रशुध्द माहिती, शिक्षण आणि संवाद आराखडा, कोअर चमुची स्थापना, एकाकेंद्राभिमुखता, पेयजलास प्राधान्य, भूपृष्ठीय आणि भूजल संयुक्त वापर, प्रभावी क्षमता बांधणी, व्यापक जनजागृती, शास्त्रीय माहितीचा सुयोग्य वापर असे महत्त्वाचे मुद्दे वेबिनारच्या माध्यमातून पुढे आले आहेत. या वेबिनारमध्ये युनिसेफ तसेच भूजल क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था अक्वाडॅम, प्रायमुव्ह, पाणी फाऊंडेशन यांची उपस्थिती होती. याबरोबरच यशदा, पुणे आणि कर्नाटक राज्यातील अटल भूजल योजनेतील अधिकारी सहभागी झाले होते.